चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 07:58 PM2019-04-27T19:58:19+5:302019-04-27T19:58:41+5:30
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. चौथ्या टप्प्यात देशभरातील 9 राज्यातील 71 लोकसभा मतदार संघातील जागांसाठी येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील आजच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या. या निवडणुकीत सुभाष भामरे, समीर भुजबळ, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, मिलिंद देवरा आदींचे भवितव्य 29 एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे.
चौथ्या टप्प्यात देशातील बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या 9 राज्यातील 71 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण 323 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघांत मतदान
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर आणि शिर्डी मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.