नवी दिल्ली - एक्झिट पोल आल्यानंतर तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आंध्रप्रदेशातील तेलगू देसम पक्षांचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये टीडीपीला २५ पैकी एकाच जागेवर आणि विधानसभेच्या १७५ जागांपैकी टीडीपीला केवळ २९ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्रपदावर टाच येण्याची शक्यता झाली आहे.
आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागत आहे. लोकसभा निकालांमध्ये आंध्र प्रदेशातील २५ पैकी २४ जागांवर जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसला आघाडी मिळाली असून तेलगू देसम केवळ विजयवाडा मतदार संघात आघाडीवर आहे.
निकालांमधील ट्रेंड कायम राहिल्यास आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसची आगेकूच रोखणं चंद्राबाबूंना अवघड जाईल, असं दिसत आहे. आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात चंद्राबाबू अपयशी ठरल्याने त्यांच्याविरोधात नाराजी होती. त्यातच त्यांनी काँग्रेसलाही चार हात दूर ठेवल्याने मतांची मोठी विभागणी झाल्याने चंद्राबाबूंना फटका बसत असल्याच मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीत टीडीपीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. येथील १७५ विधानसभा मतदार संघापैकी १४५ जागांवर वायएसआर काँग्रेसने आघाडी घेतली असून टीडीपी २९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे चंद्राबाबू नायडू यांच्यावर मुख्यमंत्री पद गमावण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे.