नवी दिल्ली - काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या तक्रारीनंतर 'नमो टीव्ही'संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि 'आप'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारासाठी दुरुपयोग करण्यात असल्याचा आरोप केला होता. तसेच निष्पक्ष पद्धतीने निवडणूक व्हावी यासाठी 'नमो टीव्ही' बंदी घालण्याची मागणी केली होती.
एखाद्या राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असावी का, तेही आचारसंहिता लागू असताना, असा सवाल आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाला केला होता. तसेच असं करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
या संदर्भात माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वात एका पॅनलने निवडणूक आयोगाला भेट दिली होती. त्यावेळी या पॅनलने दुरदर्शनचा दुरुपयोग केल्यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन दिले. ज्यात म्हटले होते की, निवडणुकीत सर्वच पक्षांना समान वागणूक मिळायला हवी. निवडणुकीसाठी सरकारी प्रसारण सेवेचा वापर व्हायला नको. नमो टीव्हीचा वापर राजकीय प्रचारासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली.