दिग्विजय सिंहांसाठी साधूंची फौज मैदानात उतरविणारे कम्प्युटर बाबा गायब ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:22 PM2019-05-09T14:22:38+5:302019-05-09T14:23:38+5:30
दिग्विजय सिंह यांच्यासाठी पुढे सरसावलेले कम्प्युटर बाबा यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी कम्प्युटर बाबांची भाजपविरुद्ध सुरू असलेल्या हटयोग आणि धुनीची चौकशी सुरू केली आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनात शेकडो साधुंची फौज घेऊन मैदानात उतरलेले कम्प्युटर बाबा भोपाळमधून अचानक गायब झाले आहेत. कम्प्युटर बाबांचे हजारो साधुंसोबत सुरू असलेले समागम स्थळ रिकामे झाल्याचे चित्र आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्यासमोर मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे आव्हान आहे. त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार ठरत आहे.
दिग्विजय सिंह यांच्यासाठी पुढे सरसावलेले कम्प्युटर बाबा यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी कम्प्युटर बाबांची भाजपविरुद्ध सुरू असलेल्या हटयोग आणि धुनीची चौकशी सुरू केली आहे. याच चौकशीमुळे कम्प्युटर बाबा गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कम्प्युटर बाबांच्या समागम सोहळ्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. तर शुक्रवारी भोपाळ मतदार संघातील प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कम्प्युटर बाबा कमी सक्रीय दिसत आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशासंदर्भात कम्प्युटर बाबांकडून काहीही माहिती देण्यात आली नाही.
कम्प्युटर बाबा शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तत्कालीन सरकारने त्यांना मंत्रीपद बहाल केले होते. मात्र काही दिवसांनी कम्प्युटर बाबा शिवराज सरकारवर नाराज झाले होते. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध भूमिका घेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.