नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबकाँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरुन सध्या जोरदार घमासान चालू असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या चंदिगड मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होत्या. मात्र, काँग्रेसकडून त्यांचा या निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला आहे.
चंदिगड मतदार संघातून नवज्योत कौर यांच्यासह पवन बन्सल आणि मनीष तिवारी यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत होती. अखेर, चंदिगड मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पवन बन्सल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नवज्योत कौर या चंदिगड मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत होत्या. चंदिगड मतदार संघातून आपल्या काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावर पार्टी नाराज असून त्यामुळेच नवज्योत कौर यांना उमेदवारी देण्यात आली नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पवन बन्सल यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपाच्या उमेदवार किरण खेर यांनी त्यांचा पराभव केला होता. याआधी 2009 झालेल्या निवडणुकीत पवन बन्सल निवडून आले होते.