नवी दिल्ली - राजधानी दिल्लात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युतीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेआपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतील सातपैकी सहा मतदार संघातील उमेदावारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यासह जे.पी. अग्रवाल, अरविंदर सिंह लवली, अजय माकनसह दिग्गजांचे नावे सामील आहेत. काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर दिल्लीतील लोकसभेचे घमासान आणखीच रंगतदार होणार आहे. काँग्रेसच्या यादीत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यावेळी चांदणी चौक मतदार संघातून जे.पी. अग्रवाल, नॉर्थ-ईस्ट दिल्लीतून शीला दीक्षित, ईस्ट दिल्लीतून अरिंदर सिंह लवली, नवी दिल्लीतून अजय माकन, नॉर्थ वेस्ट दिल्लीतून राजेश लिलोथिया आणि वेस्ट दिल्लीतून महाबल मिश्रा मैदानात आहेत. तर साऊथ दिल्लीतील उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्यामुळे आप आणि काँग्रेस यांच्यातील युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसला दिल्लीत ४-३ फॉर्म्युला हवा होता. तर आप ५-२ वर ठाम होते. तसेच दिल्लीसह इतर राज्यात देखील आप आणि काँग्रेस यांच्यात युतीसाठी चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसने उमेदवार घोषित केल्यामुळे युती होणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे.
शीला दीक्षित-मनोज तिवारी लढत रंगणार
नॉर्थ ईस्ट दिल्लीत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि अभिनेते मनोज तिवारी यांच्यात लढत होणार आहे. भाजपकडून नॉर्थ ईस्ट दिल्लीतून मनोज तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आम आदमी पक्षाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. तर चांदणी चौकमध्ये भाजपकडून डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे जे.पी. अग्रवाल यांचे आव्हान असणार आहे.