मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून भाजपने जबरदस्त बहुमत मिळवले. त्याचाच कित्ता भाजपकडून पुन्हा एकदा गिरवण्यात येत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने आपल्या जाहिरनामा प्रसिद्द केल्यानंतर लगेचच भाजपने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये भाजपच्या जाहिरनाम्यात सर्वकाही मोदी असचं सूचित करण्यात आले आहे.
उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, सामान्य नागरिक आणि गरिबांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे. तर भाजपने मध्यमवर्गीय आणि राष्ट्रवाद यावर भर दिला आहे. अर्थात हे दावे या पक्षांनी केले आहे. परंतु, सध्या दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्याचे कव्हरपेज चर्चेचा विषय ठरले आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची फळी व्यासपीठावर होती. या जाहिरनाम्याच्या कव्हर पेजवर भारतीय जनता दिसत आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो छोटा लावण्यात आला आहे. कव्हर पेजवरून देखील काँग्रेसने भारतीय जनताच आपला केंद्रबिंदू असल्याचा संदेश दिला आहे. तर कव्हर पेजवर राहुल गांधी यांचा फोटो छोटा घेतल्यामुळे युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी दर्शविल्याचे वृत्त होते. मात्र राहुल यांनी स्वत:पेक्षा जनतेला प्राधान्य दिले, निश्चितच आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्याच्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो घेण्यात आला आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष किंवा एकाही ज्येष्ठ नेत्याचा फोटो या जाहीरनाम्यावर दिसत नाही. तर जनता देखील कुठेही नाही, यामुळे भाजपच्या जाहिरनामा म्हणजे, 'सिर्फ मोदी ही मोदी', अशी चर्चा रंगत आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहे. काँग्रेसचा जाहिरनामा लाखो भारतीयांचा आवाज आहे. परंतु, भाजप जाहिरनामा व्यक्ती केंद्रीत असल्याचे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.