नवी दिल्लीः आपला 'प्रिय मित्र' - भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेपासून चार हात लांबच राहण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. शिवसेनेची आणि आमची विचारधाराच वेगळी आहे, त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांना 'टाळी' देण्याचा, सोबत घेण्याचा काही संबंधच नाही, असं पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी आज एनएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं.
केंद्रातील मोदी सरकारला २०१९च्या निवडणुकीत धक्का देण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकीचं बळ वापरण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यापासूनच ही मोर्चेबांधणी सुरू झालीय आणि आता या हालचालींना वेग आलाय. नेतेमंडळींच्या भेटीगाठी वाढू लागल्यात. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावेळीही या ऐक्याचं दर्शन घडलं होतं.
या पार्श्वभूमीवर, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने काँग्रेस 'मिशन २०१९'साठी इतर विरोधकांप्रमाणेच शिवसेनेलाही सोबत घेणार का, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. भाजपासोबतच सत्तेत असतानाही नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर सेना सातत्याने बाण सोडत असते. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावेळीही त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या गळाभेटीचं शिवसेनेनं कौतुक केलं होतं. त्यानंतर, काही दिवसांतच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, त्या शुभेच्छांचा आणि शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा काहीही संबंध नसल्याचं काँग्रेसनं नमूद केलंय.