Lok Sabha Election 2019 ; सातव्या टप्प्यातील 170 उमेदवारांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 10:49 AM2019-05-19T10:49:42+5:302019-05-19T10:58:13+5:30
गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात आहे. 'नॅशनल इलेक्शन वॉच' आणि 'एडीआर' या संस्थाकडून सातव्या टप्प्यातील 918 पैकी 909 उमेदवारांच्या अर्जांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यात 909 उमेदवारांपैकी 170 (19 टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. यात खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारखी गुन्ह्यांची त्यांच्या नावावर नोंद असल्याचे आकडेवारी सांगते.
गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. 34 प्रकरण खूनाचा प्रयत्न, 7 अपहरण प्रकरणाशी संबंधित आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या रिपोर्टनुसार प्रमुख पक्षात भारतीय जनता पक्षाचे 43 पैकी 18 उमेदवार , काँग्रेसच्या 45 पैकी 14 , बहुजन समाज पक्षाच्या 39 पैकी 6 , आम आदमी पक्षाच्या 14 पैकी 3 उमेदवारांविरोधात गुन्हे असल्याचे घोषित केले आहे.
'नॅशनल इलेक्शन वॉच' आणि 'एडीआर'च्या रिपोर्टनुसार विश्लेषण करण्यात आलेल्या 909 उमेदवारांपैकी 159 उमेदवार राष्ट्रीय पक्षातील, 68 राज्यस्तरीय पक्षातून, 369 मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षाकडून आणि 313 उमेदवार हे अपक्ष आहेत.