नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षकडून ज्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापायचे असतेतेथील, उमेदवारी निश्चित करण्यास विलंब करण्यात येतो. असंच काहीच चित्र या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. भाजपने ज्या मतदार संघातील उमेदवार बदलला तेथील उमेदवारी उशीरा जाहीर केली आहे. हा भाजपचा जणू फंडाच आहे. मात्र हा फंडा आपल्यावर चालणार नसल्याचे दिल्लीतील भाजपचे विद्यमान खासदार उदीत राज यांनी स्पष्ट केले. तसेच बंडखोरीचे निशान फडकवले आहे.
आपले तिकीट कापले जाणार या शंकेमुळे उदीत राज यांनी उत्तर पश्चिम दिल्लीतील आपली उमेदवारी जाहीर करण्याची मागणी भाजपकडे केली आहे. तसेच उदीत यांनी स्पष्ट केली की ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसेच भाजपने तिकीट टाळल्यास आपण भाजपला रामराम ठोकणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याआधी त्यांनी भाजप दलितांना धोका देणार नसल्याचे म्हटले होते.
आपला भारतीय न्याय पक्ष भाजपमध्ये विलीन करणारे उदीत राज यांची राजकीय कारकिर्द गंमतीदार राहिली आहे. उत्तर प्रदेशातील रामनगर येथे जन्मलेले उदीत राज सनदी अधिकारी होते. त्यांनी दिल्लीत आयकर विभागाचे उपायुक्त, संयुक्त आणि अतिरिक्त उपायुक्त पदे भुषवली आहे. २००१ मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. तसेच राजकारणात प्रवेश करण्यासाठी २००३ मध्ये सरकारी नोकरी सोडली होती. तसेच भारतीय न्याय पक्षाची स्थापना केली होती.
दरम्यान उदीत राज अशा स्थितीत काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणाऱ्या उदीत यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि 'आप'ने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे उदीत राज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, अशीही चर्चा आहे.