नवी दिल्ली - काँग्रसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आधीच म्हटले केले होते की, दिग्विजय सिंह यांनी इंदौर किंवा भोपाळ सारख्या आव्हानात्मक मतदार संघातून निवडणूक लढवावी. या दोन मतदार संघात अनेक वर्षांपासून काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेते सांगितले की, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. तसेच दिग्विजय सिंह यांना इंदौर, जबलपूर किंवा भोपाळमधून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले होते. अखेरीस भोपाळमधून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.
कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंह यांनी आव्हानात्मक जागेवरून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. कमलनाथ यांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह म्हणाले होते की, मी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. राहुल गांधी आपल्याला जिथून सांगतील तेथून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असंही ते म्हणाले होते. परंतु त्यांची ईच्छा राजगड येथून निवडणूक लढविण्याची होती.
दुसरीकडे भाजपकडून भोपाळ मतदार संघात लोकसभेसाठी स्थिनिक नेता देण्याचे ठरविण्यात आले आहे. सध्या या मतदार संघातून भाजपचे आलोक संजर खासदार आहेत.