नवी दिल्ली - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातून केली होती. त्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे राजकारण सोडून हिंदूत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला. काँग्रेसनेच पहिल्यांदा 'हिंदू आतंकवाद' हा शब्द उच्चारून हिंदूंना बदनामा केल्याचा आरोप मोदींनी केला होता. आता हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचे मोदींनी समर्थन केले आहे. यावर काँग्रेसकडून भाजप आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.
भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंह यांना प्रज्ञा सिंह आव्हान देणार आहे. त्याच दिग्विजय सिंह यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच हिंदू आतंकवाद शब्द सर्वप्रथम उच्चारणाऱ्या व्यक्तीला भाजपने मंत्रीपद दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच हिंदू आतंकवाद शब्द उच्चारणाऱ्या आता पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट देण्यात आल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपने अशा व्यक्तीला केंद्रीय मंत्री बनवले ज्याने हिंदू आतंकवाद हा शब्द सर्वप्रथम अधिकृत उच्चारला. यावर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्टीकरण द्यावे. ज्या व्यक्तीने गृहसचिव पदावर असताना हिंदू आतंकवाद शब्द उच्चारला त्यालाच भाजपने तिकीट दिले आहे. तसेच याआधी त्यांला केंद्रीय मंत्रीपद देखील देण्यात आल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.
यावेळी दिग्विजय सिंह यांचा रोख माजी गृहसचिव आणि भाजपनेते आर.के. सिंह यांच्यावर होता. तसेच आर.के. सिंह हेच हिंदू आतंकवाद शब्दाचे जन्मदाते असल्याचे म्हटले आहे.