नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार आले आहेत. जन्माने पुणे असलेल्या डिंपल यांना कारकिर्दीतील पहिल्या निवडणुकीतील पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यांनी हार मानली नाही. तसेच आपल्या मनमिळावू स्वभावाच्या जोरावर जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
अखिलेश यादव यांनी आपला कनोज लोकसभा मतदार संघ २०१२ पत्नी डिंपल यांना दिला. त्यानंतर त्यांनी या मतदार संघातून सपाचे प्रतिनिधीत्व केले. आता डिंपल यांना कनोज लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी आहे.
डॉ. राम मनोहर लोहिया यांना आदर्श मानत असलेल्या डिंपल पुन्हा एकदा कनोजमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अखिलेश यांनी कनोज मतदार संघ डिंपल यांच्यासाठी सोडला होता. त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बसपा, काँग्रेस आणि भाजपने माघार घेतल्यानंतर डिंपल बिनविरोध खासदार झाल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत देखील डिंपल यांनी कनोज मतदार संघ सुरक्षीत ठेवला होता.
डिंपल यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला होता. जन्माने पुणेकर असलेल्या डिंपल यांचे महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तर प्रदेशात शिक्षण झाले. लखनौ विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांचा अखिलेश यादव यांच्याशी विवाह झाला. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. मात्र २०१२ मध्ये विजय मिळवून त्यांचा राजकीय प्रवास प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.
मागील सहा लोकसभा निवडणुकांपासून कनोज मतदार संघ समाजवादी पक्षाकडे आहे. २०१४ मध्ये डिंपल १९ हजार ९०७ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी बसपाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत असून डिंपल यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे.
विधानसभेतील पराभवामुळे आव्हान
कनोज लोकसभा मतदार संघात तीन जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचपैकी चार विधानसभा मतदार संघात भाजपने विजय मिळवला. त्यामुळे सपाचा गड समजल्या जाणाऱ्या कनोज मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी डिंपल यांच्यासाठी वाटते तेवढे सोपं नाही, हे देखील तेवढच खरं.