नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत बूथ कॅप्चरिंगचा केलेला आरोप आणि त्याचा व्हिडिओ निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी स्मृती इराणी यांनी एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर बुथ कॅप्चरिंगचा आरोप केला होता. तसेच जबरदस्तीने लोकांचे मतदान काँग्रेसला करून घेण्यात येत असल्याचे म्हटले होते. मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचे निवडणूक आयोगाने म्हणणे आहे.
अमेठी येथील मतदानाच्या वेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधींकडून बूथ कॅप्चर करण्यात आल्याचा आरोप केला होता. या संदर्भातील व्हिडिओ स्मृती यांनी आपल्या ट्विटर हँडलवर टाकला होता. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला म्हणते की, मला कमळाला मतदान करवयाचे होते, परंतु, जबरदस्तीने काँग्रेसच्या चिन्हावर टाकण्यात आले. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.
यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, स्मृती इराणी यांच्या तक्रारीनंतर सेक्टर अधिकारी आणि ऑब्जर्वर यांना संबंधीत बूथवर पाठवण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी बुथवरील सर्व राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटशी चर्चा केली. त्यातून व्हिडिओत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
इराणींवर आणखी एका खोट्या व्हिडिओचा आरोप
स्मृती इराणी यांच्यावर आणखी एका खोट्या व्हिडिओचा आरोप करण्यात येत आहे. अमेठीतील एका रुग्णालयात एका रुग्णांच्या मृत्यूसंदर्भातील एक व्हिडिओ स्मृती यांनी पोस्ट केला होता. या व्हिडिओमधील व्यक्ती सांगते की, मी माझ्या नातेवाईकाला अमेठीच्या संजय गांधी रुग्णालयात घेऊन गेलो होतो. मात्र रुग्णालयात उपचार मिळाले नाही. तसेच हे योगी-मोदींचे रुग्णालय नसून येथे आयुष्यमान कार्ड चालणार नाही, असंही आपल्याला सांगण्यात आले, असा दावा त्याने व्हिडिओत केला होता. हा व्हिडिओ देखील नकली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णाकडे आयुष्यमान कार्ड नसताना देखील रुग्णालयात भार्ती करण्यात आले होते. मात्र एका दिवसाने रुग्णाचे निधन झाले होते.