मोदींना क्लीन चीट देण्यावरून निवडणूक आयोगात मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:27 PM2019-05-04T15:27:38+5:302019-05-04T15:31:31+5:30
कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने याविषयी बैठक बोलवली होती. बैठकीत मात्र २-१ च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश होता.
मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल क्लीन चीट देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मोदींना क्लीन चीट देण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्याच काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदींना दिलेली क्लीन चीट त्या अधिकाऱ्यांना मान्य नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. लातूर आणि वर्धा येथील सभेत मोदींनी वादग्रस्त विधान केल्याचे कॉंग्रेसने आरोप केला होता.
महाराष्ट्रातील वर्धा येथे निवडणूक प्रचार सभेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायनाडमध्ये अल्पसंख्याक मतदार अधिक असल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तेथून निवडणूक लढत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, लातूर येथील सभेत सैनिकाच्या नावाने मतदान मागितले असल्याचा आरोप सुद्धा कॉंग्रेसने मोदींवर केला होता.
कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने याविषयी बैठक बोलवली होती. बैठकीत मात्र २-१ च्या बहुमताने मोदींना क्लीन चिट देण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश होता.
निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली असली तरीही, दोन निवडणूक आयुक्तांनी या निर्णयाबद्दल मतभेद व्यक्त केले असल्याची माहिती समोर आल्याने चर्चेचा विषय बनला आहे