नवी दिल्ली - गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मतमोजणी आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन) संबंधित तक्रारी हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक नियंत्रण कक्ष तयार केले आहे. निवडणुकीच्या निकालापर्यंत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असेल. यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
मतमोजणी आधीच विरोधकांनी ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्हे उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने त्यादृष्टीने तक्रारी हाताळण्यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार केले आहे. यात, ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रांगरूमची सुरक्षा, उमेदवाराच्या प्रतिनिधीला स्ट्रांगरूमच्या आतमध्ये सोडण्याची परवानगी, सीसीटीव्ही सुरक्षा, ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक अडचण याबाबतीत मदतीसाठी या नियंत्रण कक्षातून मदत केली जाईल. यासाठी, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 011303052123 हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
या हेल्पलाइनमुळे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन देशातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी सुरु करण्यात आली आहे. याद्वारे उमेदवारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.
विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या सुरक्षाव्यवस्था विषयी केलेल्या आरोपांनंतर मंगळवारी मोठा वाद पहायला मिळाला. त्याबरोबर, सोशल मीडियावर सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ईव्हीएम उघड्या ट्रकमधून नेताना दिसत आहे. परंतु निवडणूक आयोगाने सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.