छत्तीसगढ़ - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्यात रविवारी मतदान होत आहे. छत्तीसगढमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानाचा बेजवाबदारपणा समोर आला आहे. मतदानापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनतर या मतदान केंद्रावरील सर्वच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर संबधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
छत्तीसगढमधील बिलासापुर येथील भगेड़ मतदान केंद्रावर शनिवारी रात्री नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या आदल्यादिवशीच ईव्हीएम मशीन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याचा बेजवाबदारपणा समोर आला आहे. ईव्हीएम मशीनचा कसा उपयोग करायला हवा, याबाबत निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना आधीच प्रशिक्षण देत असते. मात्र असे असताना ही अधिकाऱ्यांनी मशीन उघडून त्याची चाचणी केल्याने निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, या मतदान केंद्रावरील सर्वच अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकारी पाठवण्यात आले आहे.
याआधी दुसऱ्या टप्प्यातील आगरा लोकसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या बेजवाबदारपणामुळे तेथील मतदान रद्द करावे लागले होते. आगराच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचण येथ असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी स्ट्रॉन्ग रुममध्ये मशीन ठेवण्याऐवजी एका गोदामात नेऊन ठेवल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाला परत मतदान घ्यावे लागले होते.