नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान झाल्यानंतर रविवारी अनेक संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले. यापैकी अनेक संस्थांनी एनडीएला बहुमत दाखवले आहे. तर युपीएला ७७ ते १०८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३३९-३६५ जागा दाखविण्यात आल्या आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ चेहरे पराभवाच्या छायेत आहेत.
उत्तर प्रदेशच्या कनोज मतदार संघातील उमेदवार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यासाठी एक्झिट पोलमध्ये धोका दाखविण्यात आला आहे. या जागेवर भाजप उमेदवाराच्या विजयाची शक्यता आहे. तर मैनपुरी मतदार संघ समाजवादी पक्षाचा गड मानला जातो. मात्र यावेळी सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्यासाठी स्थिती गंभीर दाखविण्यात आली आहे.
फतेपूर सिक्री येथील काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते राज बब्बर यांचा देखील पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलने वर्तविली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानुसार काँग्रेज-आरजेडी नेत्यांवर देखील टांगती तलवार आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार मजबूत दिसत आहे. तर पाटलीपुत्र मतदार संघातून लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांचा मार्ग देखील खडतर दिसत आहे.
दरम्यान अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मांतोडकर हिच्यासाठी मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील लढाई खडतर ठरण्याचा अंदाज आहे. येथून भाजप उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील उमेदवार आतिशी मार्लेना यांचा विजय डळमळीत मानला जात आहे.
माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते एचडी देवेगौडा कर्नाटकमधील तुमकूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र एक्झिट पोलनुसार देवेगौडा यांच्यावर देखील पराभवाचे संकट आहे. देवेगौडा यांच्याविरुद्ध भाजप उमेदवार जीएस बसवराज यांचे पारडे जड वाटत आहे. तर काँग्रेससाठी भोपाळमधून देखील निराश करणारा एक्झिट पोल आलेला आहे. येथून प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्याविरुद्ध काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा विजय कठिण दिसत आहे.
देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसराय मतदार संघात भाजपचे गिरीराज सिंह यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे युवा नेता कन्हैया कुमार यांचा मार्ग खडतर दिसत आहे. कन्हैया कुमार सीपीआयच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे मध्ये प्रदेशातील गुणा मतदार संघातून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. भाजपने कृष्णपाल सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार जया प्रदा मैदानात आहेत. जया प्रदा यांची लढत सपाच्या आझम खान यांच्याविरुद्ध आहे. एक्झिट पोलनुसार जया प्रदा पराभवाच्या छायेत दिसत आहेत.