कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
दरम्यान, काल लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, 'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू'.
यंदाची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आज तक आणि एक्सिस माय इंडियाने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 19 ते 23 जागा मिळू शकतात.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 19 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसची फक्त एक जागा निवडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये यंदा कम्युनिस्टांना खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. तर तृणमूल काँग्रेसलाही 19च्या जवळपास जागा मिळण्याचा अंदाज आहे.
23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचे सरकार येणार हे सांगितले जाते.
निवडणूक प्रचारादरम्यान विविध संस्थांनी मतदारांमध्ये जात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष, उमेदवार यांचा विजय, पराभव याची गणिते मांडली जातात. सी-व्होटर, सीएसडीएस, नेल्सन, लोकनिती, चाणक्य यासारख्या संस्था ओपिनियन पोल घेत असतात. या संस्थांची आपली स्वत:ची टीम असते, जी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांची मते जाणून घेते.