नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीराज सिंह यांनी अखेरीस बिहारमधील बेगूसरायमधून सीपीआयएमचे उमेदवार कन्हैया कुमार यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास होकार दिला आहे. तसेच मी नाराज कधीही नव्हतो, परंतु माझ्या मनात खंत होती, असंही गिरीराज सिंह यांनी म्हटले.
माझ्या मनात खंत होती. पक्षावर नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. आज मी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला बराच वेळ दिला. तसेच माझं ऐकूण घेत माझ्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मी त्यांचा आभारी असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले.
गिरीराज सिंह यांची भेट घेतल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गिरीराज बेगूसरायमधूनच निवडणूक लढविणार आहेत. मी त्यांच्या सर्व समस्या ऐकूण घेतल्या आहेत. त्यांच्या सर्व समस्या पक्षाकडून सोडविल्या जाणार आहेत. निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा.
मतदार संघ बदलल्यामुळे गिरीराज सिंह नाराज होते. सध्या ते नवादा मतदार संघातून खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना बेगूसरायमधून तिकीट देण्यात आले आहे. याच मतदार संघातून गिरीराज सिंह यांच्याविरुद्ध सीपीआयएमच्या कन्हैया कुमारचे आव्हान आहे. कन्हैया कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक असून गिरीराज यांच्यासोबतच्या लढाईसाठी ते उत्सुक आहेत. तसेच आपली लढाई राजद किंवा महायुतीसोबत नसून गिरीराज यांच्याविरुद्ध असल्याचे कन्हैया यांनी म्हटले होते.
दरम्यान गिरीराज सिंह यांचा नवादा मतदार संघ जागा वाटपात रामविलास पासवान यांच्या एलजेपी पक्षाकडे गेला आहे. येथून एलजेपीचे चंदन कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.