नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींच्या यशानंतर भारताच्या शेजारील देशांच्या नेतेमंडळी आणि माध्यमे यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. पाकिस्ताननंतर आता चीनच्या शासकीय मीडियाने आपले मत व्यक्त केले आहे. चीनच्या 'द ग्लोबल टाइम्स' मध्ये मोदींच्या विजयावर लेख लिहण्यात आला आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधान होणाऱ्या मोदीं समोर मोठ्याप्रमाणात समस्या उपस्थित राहणार आहेत, मोदींसाठी पुढील काळ खडतर असणार आहे. असे चीनच्या लेखात लिहण्यात आले आहे.
मोदींनी शपथ घेतल्यानंतर देशातील बिगडलेली अर्थव्यवस्था ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या असल्याचंं ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. देशातील अनेक मोठ्या समस्या मोदींची वाट पाहत आहेत. त्यामुळे मोदींसाठी पंतप्रधानाचा दुसराकाळ वाटतो तितका सोपा नाही. मागील दोन महिन्यापासून भारतातील अर्थव्यवस्थेमधील घसरण मोठी चिंतेची बाब आहे. तसेच, देशातील बेरोजगारी सारख्या मोठ्या समस्यांवर मोदींना निर्णय घ्यावे लागणार आहे. देशातील ह्या आव्हानात्मक समस्यांशी लढणे म्हणजे मोदींची अग्निपरीक्षाच आहे. असे चीनच्या ग्लोबल टाइम्सच्या लेखात सांगण्यात आले आहे.
लेखात असे म्हटले आहे की, अमेरिका आणि चीनशी संबंध आणि सहकार वाढविण्यासाठी भारताच्या नवीन सरकारसाठी एक कठीण आव्हान असणार आहे. परंतु, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी, जुन्या पद्धतीची आर्थिक संरचना आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे या लेखात म्हटले गेल आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज चीनच्या शासकीय माध्यमांनी निवडणुकीपूर्वी वर्तवला होता. भारत देशात नरेंद्र मोदींच्या विरोधात पंतप्रधान पदासाठी सक्षम उमेदवार नाही. विरोधीपक्षाचे संघटन मजबूत नसल्याने भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा चीन सरकारचे मुखपत्र असलेले ' द ग्लोबल टाइम्स ' ने म्हटले होते.