नवी दिल्ली - पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकसंदर्भातील वक्तव्यामुळे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि अरुण जेटली यांनी देखील यावरून काँग्रेसला घेरले होते. यावर आता सॅम पित्रोदांनी आक्रमक भूमिका घेत, भाजपवर पलटवार केला आहे. तसेच आपण असं काहीही बोललो नाही, ज्यामुळे भारतीय सैन्याचा अपमान होईल, असंही पित्रोदा यांनी सांगितले.
पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे पित्रोदा यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. भारतीय सैन्याविषयी मी काहीही अपमानजनक बोललो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व भाजपनेते खोटं बोलत आहेत. मी बोललेल्या ४० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कुठं तरी मी सैन्याचा अपमान केल्याचे दाखवून द्या, मी आनंदाने माफी मागेल. परंतु, असं न आढळून न आल्यास पंतप्रधान मोदी, जेटली आणि शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तु्म्ही कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू शकत नाही. मी भारतात ३० वर्षे काम केले आहे. माझ्याकडे असलेली अमेरिकेची नागरिकता सोडून मी भारतात आलो आहे. परंतु तुम्ही खोट्या गोष्टींच्या आधारावर मला चुकीचं ठरवत आहात. एअरस्ट्राईकवर मी केवळ प्रश्न विचारले, तुम्ही ३०० अतिरेकी ठार झाल्याचा दावा केला. तर मी पुरावे मागितले. देशाचा नागरिक असल्यामुळे हे विचारण्याचा मला अधिकार आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये एकही अतिरेकी ठार झाला नसल्याचे वृत्त होते. मी एक शास्त्रज्ञ आहे, आकडेवारीवरच विश्वास ठेवतो, असे पित्रोदा यांनी म्हटले आहे.
माझ्यावर कुणीही बोट उचलू शकत नाही. त्यांनी मी इथे असल्याची भिती आहे. कारण मी पुढील दोन महिने भारतात राहून काँग्रेसचा प्रचार करणार आहे. मला अनेक राज माहित आहेत. माझ्याकडे काहीही संपत्ती नसून मी करासंदर्भात काहीही माहिती लपविली नाही. मी गांधीवादी असल्याचे पित्रोदा यांनी स्पष्ट केले.