नवी दिल्ली - २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती तर २०१९ मध्ये मोदींची त्सुनामी आली असं म्हणण्यास भाग पडत आहे. भाजपप्रणीत एनडीएने देशात शानदार कामगिरी करताना प्रचंड बहुमत मिळवले. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे बिहारमधील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पटना साहिब मतदारसंघातून पराभूत झालेले सिन्हा यांनी आपली खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली. सत्याशी आणि तत्वांशी तडजोड न करण्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे सिन्हा यांनी म्हटले. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचा निकटवर्तीय असण्याचा आपल्याला फटका बसला. माझं तत्वांशी एकनिष्ठ राहणे त्यांना पसंत नव्हते. भाजपमधील लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत झाले आहे. त्याचे अनेक उदाहरणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय व्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. संविधानावर सतत हल्ले करण्यात येत आहेत, असल्याने आपण भाजपपासून दुरावल्याचे सिन्हा यांनी म्हटले.
कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा पक्ष मोठाच असतो आणि पक्ष हा देशापेक्षा मोठा असतो, यावर माझा विश्वास आहे. माझं सत्यासोबत असणे मोदी ऍन्ड कंपनीला खटकत होते. त्यांनी मला अनेकदा निमूटपणे सर्वकाही पाहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर दडपण आणल्याचे सिन्हा यांनी नमूद केले.
दरम्यान ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्यासाठी विनंती केली होती. परंतु आपण काँग्रेसमध्ये सामील झालो. त्याचे दोन कारणं होती. एक म्हणजे, राहुल गांधी उद्याचा चेहरा आहेत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तीन राज्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला. राहुल यांनी सिद्ध केलं की, कोण पप्पू आणि कोण फेकू, असा टोलाही सिन्हा यांनी यावेळी लगावला.