सत्तांतर झाल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री रघुराम राजन ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:25 PM2019-03-29T12:25:31+5:302019-03-29T12:27:02+5:30
'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि काँग्रेस यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. रघुराम राजन यांनी आपण भारतात परतण्यासाठी तयार असून योग्य संधीची वाट पाहात असल्याचे आधीच म्हटले आहे. आता 'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
रघुराम राजन यांच्या सल्ल्यानंतर काँग्रसेने सत्तेत आल्यास देशातील गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजन यांच्या अर्थनितीचा काँग्रेस फायदा घेणार असल्याचे समजते. तसेच सत्ता आल्यास देखील काँग्रेस राजन यांना सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतं.
१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्यानंतर काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे तब्बल दहा वर्षे देशाचे नेतृत्व सोपविले होते. आता देखील देश आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यासाठी उत्तम अर्थतज्ज्ञांची भारताला गरज आहे. राजन हे अर्थतज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचीत आहे. त्यामुळे त्यांना युपीएकडून अर्थमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यास ते काँग्रेसच्या पथ्यावरच पडणार आहे.
सध्या राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या 'बूथ स्कूल ऑफ बिजनेस'मध्ये व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधील विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.