मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलेले असून नांदेडमध्ये विजयाचा दावा करणारे दानवेच पराभवाच्या छायेत असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितले. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
महाराष्ट्रात काँग्रेसप्रणीत आघाडीला २५ जागा मिळतील, असा दावा चव्हाण यांनी केले. तसेच जालना मतदार संघात धक्कादायक निकाल लागतील. विदर्भात देखील काँग्रेसची कामगिरी सुधारणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. लोकशाहीत यश-अपयश येतच असतात. परंतु, काँग्रेसला मोठे यश मिळेल. नांदेड व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मी सभ्या घेतल्या. अर्थात राज्यातील निकालांची सर्व जाबबादारी प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपलीच असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
दरम्यान इव्हीएम मशिनवर अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. अनेक ठिकाणी इव्हीएमची चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगात देखील अनेक मुद्दांवरून मतभेद आहेत. सत्ताधारी पक्षांकडे यंत्रणा असते. त्यातून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येतो. मात्र तरी देखील इव्हीएम संदर्भात आम्ही दक्ष आहोत, असही चव्हाण यांनी स्पष्ट केले.