मुंबई - देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दररोज सभा घेणे सुरू आहे. या सभांमध्ये मोदीजी अनेक मुद्दे उपस्थित करत आहेत. कधी विरोधांवर कडाडून टीका करतात तर कधी आपल्या सरकारने केलेल्या कामांची माहिती देतात. त्यातच आता मोदींच्या एका सभेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दावा करण्यात येतोय की, पंतप्रधान मोदी यांनी स्वत:ला पठान का बच्चा म्हटले आहे.
फेसबुक आणि ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मोदीजी 'मै पठान का बच्चा हूं. मै सच्चा बोलता हूं. सच्चा करता हूं.' असं म्हणताना दिसत आहे. यावरून नेटकरी मोदींना प्रश्न विचारत आहेत की, तुम्ही ओबीसी असल्याचे म्हणता, तर आता पठान कसे झालात. तर अनेकांच्या मते मोदींचा हा व्हिडिओ काश्मीरमधील सभेतील आहे.
पहा व्हिडिओ
सोशल मीडियावर मोदींच्या या वक्तव्याची क्लीप अनेकांनी शेअर केली आहे. तसेच मोदींविषयी नको त्या कमेंट करण्यात येत आहेत. मात्र या व्हिडिओचा तपास घेतल्यानंतर आश्चर्यचकित करणारे सत्य समोर आले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ २३ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या सभेतील आहे. राजस्थानातील टोंकमध्ये मोदींची सभा होती. यूट्यूबवर नरेंद्र मोदी चॅनलवर मोदींचे संपूर्ण भाषण अपलोड करण्यात आले. जेव्हा निवडणुका जाहीर देखील झाल्या नव्हत्या, तेंव्हाचा हा व्हिडिओ आहे.
या रॅलीत मोदींनी सांगितले की, इमरान खान पंतप्रधान झाल्यानंतर आपण फोन करून त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी आपण त्यांना गरीबी आणि असाक्षरेतविरुद्ध लढा देण्याचे आवाहन केले होते. त्यावर इमरान यांनी प्रत्युत्तरात, 'मै पठान का बच्चा हूं. मै सच्चा बोलता हूं. सच्चा करता हूं.' अस म्हटल्याचे मोदींनी सांगितले. मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये मोदींचे पुढील वक्तव्य ठेवण्यात आले नाही. त्यामुळे या व्हिडिओतून गोंधळ निर्माण झाला आहे.
राजस्थानमधील सभेत मोदींनी ४३ मिनिटे २९ सेकंद भाषण केले होते. यामध्ये 'मै पठान का बच्चा हूं. मै सच्चा बोलता हूं. सच्चा करता हूं.' हे वक्तव्य मोदींचे नसून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे असल्याचे स्पष्ट होते.
याआधी राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ देखील अशाच प्रकारे व्हायरल झाला होता. आता मोदींचा अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.