नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या काळात नेत्यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी एक अजबच दावा केला आहे. या दाव्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवरून मोदींना बिहारी भाषेत टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अजब दावा ऐकून लालू यांनी ट्विट केले की, 'ऐ हट बुडबक, तेरा ध्यान किधर है, रडार इधर है...'. लालूंचे हे ट्विट अनेकांनी रिट्विट केले आहे. याआधी अनेकांनी मोदींच्या एअरस्ट्राईकवरील वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे गुजरात बीजीपी या ट्विटर हँडलवरील या संदर्भातील ट्विट डीलिट करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.
पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाले होते की, 'बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का यावर संशय होता. त्यातच वैज्ञानिकांनी सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास सांगितले. मात्र माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. मात्र त्यानंतर मी म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या...', असं मोदींनी मुलाखतीत सांगितले.
'मोदीजींच्या शोधामुळे वैज्ञानिक चिंतेत'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एअर स्ट्राईकवरील वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हान यांनी देखील फेसबूक पोस्टच्या माध्यमातून मोदींवर निशाना साधला. मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! ढगात जर विमान रडारवर दिसलं नाही, किंवा रेडिओ तरंग तिथे पोचलेच नाहीत तर Air Traffic Controller त्यांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी ? येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा ! पण घाबरू नका ! या सगळ्या प्रश्नांवर 'आजतक'च्या अंजना ओम कश्यप (2000 च्या नोटेत चीप असणाऱ्या फेम) यांनी त्यांच्याकडील जमिनीखाली 200 फुटांवरच्या नोटा शोधणारी रडार भारत सरकारला देण्याचा वायदा केलेला आहे, अस पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली आहे.