दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसच्या वाट्याला; 'आप'च्या मंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:37 PM2019-05-14T17:37:44+5:302019-05-14T17:39:35+5:30
राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला.
नवी दिल्ली - दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र पाल गौतम यांनी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते, असा दावा केला आहे. दिल्लीत 'आप'ला मोठे यश मिळेल अशी आशा होती, मात्र गौतम यांच्या दाव्यामुळे ही शक्यता कमी झाल्याचे चित्र आहे.
राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला. गौतम उत्तर-पूर्व दिल्ली विधानसभा मतदार संघातील उमेदवार आहे.
दुसरीकडे 'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतांचे विभाजन टाळले असल्याचे म्हटले. दिल्लीतील मुस्लीम मतदार 'आप'ला एकतर्फी मतदान करती, अशी आशा होती. परंतु, मतदानानंतर मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याला आपच्या मंत्र्यानेच पुष्टी दिली आहे. दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघांसाठी रविवारी १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. येथे एकूण ६० टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी 'आप' आणि काँग्रेस यांच्यात युतीसाठी अनेक चर्चा झाल्या. मात्र कधी काँग्रेसकडून तर कधी आपकडून युतीसाठी सकारात्मक चर्चा झाली नाही. त्यामुळे अखेरीस उभय पक्षांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली.