भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांची भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्धची लढत सुकर होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना लोकशाही जनता दलाचा पाठिंबा मिळाला आहे. लोजदने मंगळवारी या संदर्भात घोषणा केली.
लोजदकडून आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित लोक क्रांती अभियानचे संयोजक गोविंद यादव, लोजदचे प्रदेश महासचिव प्रकाश गवांदे, उपाध्यक्ष हरिओम सूर्यवंशी, स्वरुप नायक, जिल्हाध्यक्ष विवेक जोशी आणि अश्विन मालवीय यांनी भोपाळमध्ये काँग्रेसला पाठिंबा दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप लोजदकडून करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या नेतृत्वातील सरकारकडून लोकशाहीच्या चारही स्तंभावर हल्ला करण्यात येत आहे. पत्रकारिता क्षेत्र संकटात आहे. स्वयत्त संस्थांमधील ढवळाढवळ वाढली आहे. ही संकटे दूर करण्यासाठी भाजपला पराभूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे लोजदने स्पष्ट केले.
दरम्यान सत्तेत आलेल्या भाजपने आश्वासने पूर्ण करण्याऐवजी न्यू इंडियाच्या नावावर देशातील नैसर्गिक संपत्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांना बहाल केली. संविधान वाचविण्यासाठी आणि मतांचे विभाजन रोखण्यासाठी भाजप विरोधी पक्षांना लोजदकडून पाठिंबा देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याआधी भाजपकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेले कम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांना लोकसभेसाठी पाठिंबा दर्शविला आहे. दिग्विजय सिंह यांना विविध स्तरातून मिळणारा पाठिंबा पाहता, भाजप आणि पज्ञा सिंह ठाकूर यांच्यासाठी भोपाळची लढाई तितकीशी सोपी राहिली नाही, हेच यावरून दिसून येत आहे.