नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला आता फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपायामध्ये आघाडीवर आहे. यासाठी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी 2014च्या लोकसभा विजयाचा अध्याय लिहलेल्या जागेवर आता पुन्हा एकदा पक्षाची बैठक बोलवली आहे. पर्यटन आणि जत्रेसाठी जगभरात विख्यात असलेल्या सुरजकुंडमध्ये 14 जून ते 17 जूनदरम्यान भाजपा 2019 च्या निवडणूकीची रणनीती आखणार आहे. सुरजकुंड भाजपासाठी लकी असल्याचे म्हटले जातेय. कारण 2014 च्या निवडणुकीची रणनीती याच ठिकाणी आखली होती. आता पुन्हा त्याच ठिकाणी भाजपा 2019 च्या लोकसभा विजयासाठी रणनीती आखणार आहे.
14 जून ते 17 जूनदरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय शिबीरामध्ये 2019 च्या निवडणूकीची रुपरेषा आखली जाणार आहे. या शिबिरामध्ये सर्व राज्यातील मंत्री, दिग्गज नेत्यांसोबत आरएसएस महासचिव भैय्याजी जोशीसह अमित शाहही उपस्थित असणार आहेत.
दररोज चार सत्रामध्ये मंथन केले जाणार असून यामध्ये दिग्गज नेते संबोधित करणार आहेत. या शिबिरामध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तयारीसह विरोधाकांच्या एकत्रीकरणावरही तोडगा काढण्यात येणार आह. सुत्रांच्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या या शिबिरामध्ये आताच झालेल्या पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणेही शोधण्यात येणार आहेत.
म्हणून सूरजकुंड भाजपासाठी लकी - सूरजकुंड भाजापासाठी लकी ठरले आहे. 2014 च्या लोकसबा निवडणूकीच्या विजयाचा अध्याय याच ठिकाणी लिहला होता. 2012 मध्ये पहिल्यांदा भाजपाकडून या ठिकाणी शिबिर घेण्यात आलं होतं. यामध्ये युपीए सरकारचा पराभव कसा करायचा यावर मंथन झालं होतं. याच ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पक्षाने पसंती दर्शवली होती. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूकीपूर्वी 10 सप्टेंबर 2016 ला सुरजकुंडमध्ये दोन दिवसीय शिबिराटे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पाच राज्यात विजयाचा आध्याय लिहण्याचे काम केले होतं. पंजाब वगळता इतर ठिकाणी भाजपाने आपली सत्ता स्थापन केली होती.