भोपाळ: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांचा मतमोजणी केंद्राजवळ मृत्यू झाला. हृदय विकाराच्या धक्कानं त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे सेहोर जिल्हा प्रमुख असलेले रतन सिंह ठाकूर मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती खालावल्यानं त्यांचं निधन झालं. मतमोजणी केंद्राजवळ उमेदवारीला मिळालेल्या मतांची माहिती घेण्यासाठी रतन सिंह पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागलं. ते खाली कोसळले. यानंतर त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसनं मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव केला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपाला साथ दिली. मध्य प्रदेशातील 29 पैकी 28 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ एका मतदारसंघात पुढे आहे.
मतमोजणी केंद्राजवळ हृदयविकाराचा धक्का; काँग्रेस नेत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 3:58 PM