'मै भी चौकीदार' मोहिमेत भाजपची बाजी; काँग्रेसचे पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 03:08 PM2019-03-19T15:08:32+5:302019-03-19T17:01:14+5:30
ट्विटरच्या आकडेवारीनुसार १६ आणि १७ मार्च या दोन दिवसांत ट्विटरवर #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा तब्बल १५ लाख वेळा वापर झाला होता.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकी तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून एकमेकांवर आरोपांच्या फेऱ्या झडत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर देखील एकमेकांना पछाडण्यासाठी उभय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है'च्या प्रत्युत्तरात पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी 'मै भी चौकीदार' मोहिम सुरू केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापूर्वी चौकीदार लिहिले. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या नावाआधी चौकीदार लिहिले. त्यानंतर दोन दिग्गज पक्षांच्या सोशल मीडियावरील लढाईत भारतीय जनता पक्ष जिंकताना दिसत आहे.
मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर 'मै भी चौकीदार लिहिले, त्यानंतर #MainBhiChowkidar हॅश टॅग ट्रेंडमध्ये आला होता. ट्विटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १६ आणि १७ मार्च या दोन दिवसांत ट्विटरवर #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा तब्बल १५ लाख वेळा वापर झाला होता. या व्यतिरिक्त भाजपकडून #ChowkidarPhirSe हा हॅशटॅग देखील चालविण्यात आला. हा देखील ट्रेन्डमध्ये आला होता. याचा वापर ४८ तासांत ३ लाख वेळा झाला होता.
काँग्रेस पिछाडीवर
राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर चोरीचा आरोप केला होता. त्यांनी 'चौकीदार चोर है' चा नारा दिला होता. दरम्यान भाजपने #MainBhiChowkidar मोहिम सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून देखील #ChowkidarChorHai मोहिम सुरू करण्यात आली. परंतु, #ChowkidarChorHai हा हॅश टॅग १७ आणि १८ मार्च रोजी केवळ एक लाख ६९ हजार वेळा वापरण्यात आला. जो की भाजपच्या तुलनेत १० टक्के देखील नव्हता.