मुंबई - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा पहायला मिळाला. त्यानंतर आता, दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करत आहे. तुमचे नशीब चांगले आहे की, मी शांत बसले आहे. असा इशारा पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहा आणि भाजपला दिला आहे. अन्यथा एका सेकंदात भाजप कार्यालय ताब्यात घेईल असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला.तसेच भाजपाचे पोस्टर, झेंडे तोडून टाकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली. तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आता भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. असा, आरोप अमित शहा यांनी लावला आहे.
अमित शहा स्वतःला काय समजतात,देशात सर्वश्रेष्ठ तेच आहेत का? स्वत;ला ते देव समजतात का? कुणीही त्यांच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही का? असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी अमित शहांचा समाचार घेतला. अमित शहा यांच्यावर ममतांनी समाजसुधारक विद्यासागर यांची मूर्ती तोडण्याचे आरोप लावले. भाजपने १९ रोजी होणाऱ्या मतदानासाठी बाहेरून लोक आणली असल्याचा आरोप सुद्धा ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला.
शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. त्याआधीच, तिथे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अमित शहांच्या रॅलीवेळी झालेल्या राड्यानंतर ममता बॅनर्जी आणि अमित शहा यांच्यात एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहे.