Lok Sabha Election 2019 : मायावती, अखिलेश भाजपसोबत जाणार नाही; राहुल गांधींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:29 AM2019-05-18T11:29:15+5:302019-05-18T11:30:55+5:30
देशातील विविध पक्ष निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल, असंही राहुल गांधी यांनी म्हटले.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांमध्ये युती होईल, असे संकेत दिले आहेत. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती निवडणूक निकालानंतर भाजपसोबत जाणार नाहीत, असा दावा केला आहे. राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशातील विविध पक्ष निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. मायावती आणि अखिलेश यादव भाजपसोबत जातील, असं वाटत नाही हे सांगताना राहुल यांनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे अशा स्थितीचा प्रचंड अनुभव असल्याचे म्हटले. तसेच अनुभवी लोकांना दूर करण्यासाठी मी काय नरेंद्र मोदी नाही, असा टोला देखील राहुल यांनी लगावला.
यावेळी राहुल यांना पंतप्रधानपदासंदर्भात विचारण्यात आले. त्यावर राहुल म्हणाले, २३ मे रोजी जनता जो निर्णय देईल, तो आपल्याला मान्य असेल. त्याआधी यावर आपण काहीच बोलू शकत नाही. मात्र नरेंद्र मोदी यांच्या पुनरागमानाचे ९० टक्के दरवाजे आम्ही बंद केल्याचे राहुल यांनी म्हटले. मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेस, बसपा आणि सपा एकाच विचारधारेतील आहेत. तसेच विरोधकांमध्ये काँग्रेसची भूमिका प्रथम श्रेणीची असेल, असही राहुल म्हणाले.