नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक निकालाचं चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचं मतमोजणीवरुन दिसून येत आहे. भाजपा आणि मित्रपक्षांना जवळपास साडे तीनशे जागा मिळतील, असं आकडेवारीवरुन दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सची लाट उसळली आहे. एनडीएनं 300 जागांचा टप्पा ओलांडताच अनेकांच्या सृजनशीलतेला बहार आली. दोनदा त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूंसोबत त्यांची तुलना होऊ लागली. ब्रायन लारा, ख्रिस गेल, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबतचे त्यांचे फोटोदेखील व्हायरल झाले. आता वेस्ट इंडिजसोबत भारताच्याही दोन खेळाडूंनी दोनवेळा त्रिशतक साजरा केलं आहे, या अर्थाच्या मीम्स व्हायरल झाल्या आहेत. सध्या भाजपा समर्थकांची स्थिती कशी आहे, हे दाखवण्यासाठी अनेकांनी क्रिकेटपटू इमरान ताहीरच्या फोटोंचा आधार घेतला आहे. इम्रानच्या गळ्यात भाजपाचं उपरणं असलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तर आता वर्ल्ड कपदेखील भाजपानंच खेळावा. आपण नक्की विजयी होऊ, अशी पोस्टदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अवस्थेवरदेखील जोरदार टोलेबाजी सुरू आहे.