पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून 'क्लिनचीट'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 11:12 AM2019-05-02T11:12:04+5:302019-05-02T11:12:17+5:30
ऑनलाईन तक्रारीनंतर पंतप्रधान मोदींच्या लातूरमधील भाषणाची सीडी आणि ११ पानांच्या भाषणाच्या स्क्रिप्टची निवडणूक आयोगाच्या बैठकीत पडताळणी करण्यात आली. मात्र यातून कुठेही आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने 'क्लिनचीट' दिले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना सैन्याच्या बलिदानासाठी भाजपला मतदान करणार का, असा प्रश्न केला होता. याला आचारसंहितेचा भंग म्हणता येणार असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने सैन्याच्या नावावर मत मागणे निवडणूक आचार संहितेचा भंग असल्याचे सांगत ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
ऑनलाईन तक्रारीनंतर पंतप्रधान मोदींच्या लातूरमधील भाषणाची सीडी आणि ११ पानांच्या भाषणाच्या स्क्रिप्टची निवडणूक आयोगाच्या बैठकीत पडताळणी करण्यात आली. मात्र यातून कुठेही आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि मंत्री पीसी शर्मा यांना देखील क्लिनचीट दिली आहे. मंत्र्यांनी म्हटले होते की, बुथ जिंकून द्या, नोकरी मिळवा. मात्र आयोगाला या वक्तव्यामध्ये देखील आचारसंहितेचा भंग झाल्याचे जाणवले नाही.
काय म्हणाले होते मोदी
लातूरमध्ये ९ एप्रिल रोजी झालेल्या सभेत मोदींनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना प्रश्न विचारला होता की, तुमचं पहिलं मत पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करणाऱ्या वीर जवानांना समर्पित होऊ शकतं का ? तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांनी पुलवामा येथील शहीद जवानांना अर्पित करावे, असंही आवाहन मोदींनी केले होते. यामध्ये निवडणूक आयोगाला आचारसंहितेचा भंग करणारे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यानंतर मोदींना क्लिनचीट देण्यात आली.