वाराणसीतील विजयासाठी मोदी साशंक ? बदलला प्रचार कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:01 PM2019-05-15T14:01:44+5:302019-05-15T14:13:43+5:30
उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी मोठा रोड शो केला होता. या रोड शोला एनडीएमधील विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. त्याचवेळी मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना संबोधीत केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोदींनी वाराणसीवासीयांना म्हटले होते की, आता आपण विजयानंतरच धन्यवाद करण्यासाठी वाराणसीत येणार आहोत. परंतु, विरोधाकांनी वाराणसीत प्रचारासाठी आखलेल्या योजनाबद्ध कार्यक्रमामुळे मोदी वाराणसीतील विजयासाठी सांशक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोदींनी आपला प्रचार कार्यक्रम बदलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उमेदवारी दाखल करतानाच मोदींनी निश्चित केले होते की, आता विजयानंतर वाराणसीत पाय ठेवणार आहे. मात्र १७ मे रोजी प्रचार बंद झाल्यानंतर मोदी वाराणसीत मुक्कामी राहणार आहेत. १६ मे रोजी मोदी मिर्झापूरमध्ये अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यानंतर रात्री विश्रांतीसाठी वाराणसीत दाखल होणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी येथून उमेदवार असल्याने वाराणसीत थांबणार आहेत. तसेच १७ मे रोजी वाराणसीत जाहीर सभा घेणार असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जो व्यक्ती वाराणसीतील रहिवासी नाही, अशा व्यक्तीला मतदानाच्या दिवशी वाराणसीत थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु, लोकसभेच्या उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे.
वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रोड शो करणार आहेत. तर सपा-बसपा युतीकडून शालिनी यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. शालिनी यांच्यासाठी अखिलेश यादव आणि मायावती संयुक्त सभा घेणार आहेत.
दरम्यान विरोधकांच्या योजनाबद्ध प्रचारामुळे पंतप्रधान मोदींचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी आधीच वाराणसीत ठाण मांडले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह मागील तीन दिवसांपासून वाराणसीतील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. या व्यतिरिक्त अनेक केंद्रीयमंत्री कार्नर सभा घेताना दिसत आहेत.
वास्तविक पाहता पंतप्रधान मोदी मतदानापूर्वी वाराणसीत मुक्कामी राहण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीच्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी देखील मोदी शेवटचे तीन दिवस वाराणसीत होते. त्यानंतर २०१७ मध्ये देखील मोदींनी तीन दिवस वारासणीत काढले होते. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशातील पूर्व भागात मोठे यश मिळाले होते. हाच फॉर्म्युला आता पुन्हा एकदा अंमलात आणला जात आहे.