मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेशी दौऱ्यावर होणाऱ्या खर्च बाबत विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे. त्यातच, मोदींसह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या प्रवासावर मागील पाच वर्षांत एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्र्यांच्या परदेश दौरे वाढल्याने त्याच्यावरील खर्चही वाढल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मंत्रिमंडळाच्या वेतन विभागाने ही माहिती दिली आहे.
मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागीतीली होती. यातील सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला आहे. ही रक्कम २९२ कोटी इतकी आहे. देशांतर्गत प्रवासांवर ११० कोटी खर्च झाला आहे. एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाला आहे.
गेल्या पाच वर्षांत कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण २५२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये खर्च करण्यात आले, तर देशांतर्गत प्रवासांवर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये खर्च करण्यात आले, तर देशांतर्गत प्रवासांवर ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.
आधीच मोदींच्या विदेशी दौऱ्यावरून विरोधकांनी भाजपला कैचीत पकडण्याच्या प्रयत्न केला आहे.त्यातच, पाच वर्षात सरकारच्या मंत्र्यांनी तब्बल ३९३ कोटी ५७ लाख रुपये प्रवासावर खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील काळात यावरून सत्ताधाऱ्यांची अडचण वाढू शकते.