नवी दिल्ली - भाजपचे बंडखोर नेते शुत्रघ्न सिन्हा यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाना साधला. लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापल्याच्या मुद्यांवरून सिन्हा म्हणाले की, मोदी आणि शाह यांनी न्यूटनचा तिसरा नियम विसरू नये. एकापाठोपाठ ट्विट करत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांना लक्ष्य केले.
सिन्हा यांनी भाजपला न्यूटनच्या तिसऱ्या नियमाची आठवण करून दिली. अडवाणी यांना पितासमान असल्याचे सांगत, त्यांना भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीवर सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली. सिन्हा यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. ते पटना साहिब मतदार संघातून खासदार आहेत. या मतदार संघातून भाजपने आता केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सरजी 'राफेल बाबा' आणि 'चालीस चौकीदार'ची भूमिका निभावण्यापेक्षा सुधारणा करण्यासाठी काही करता येत असल्यास करा. जे नुकसान झाले त्याची भरपाई करण्याचं काही तरी पाहा. अडवाणींच्या बाबतीत तुम्ही जे केलं त्याची शंका आधीच होती. मार्गदर्शक, पितातुल्य अडवाणी यांना पक्षापासून वेगळे केल्याचे सांगत गांधीनगरमधून शाह यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर देखील सिन्हा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान अमित यांची प्रतिमा अडवाणी सारखी किंचीतही नसून मुद्दाम शाह यांनी गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अडवाणींना अशी वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही माझ्यासोबत जे केले ते सहन करण्याजोगे आहे. मी प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे. तरी न्यूटनचा तिसरा नियम तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि अडवाणी यांच्यासोबत तुम्ही केलेले वर्तन सर्वांनी पाहिलं असल्याचे देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी नमूद केले.