मुंबई - काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभ मेळाव्यात सफाई कामगारांचे पाय धुतले होते. तसेच या कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. परंतु, पंतप्रधानांनी पाय धुतल्यानंतरही या कामगारांच्या आयुष्यात काहीही बदल झाला नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सफाई कामगारांशी बीबीसी हिंदीने घेतलेल्या मुलाखतीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत.
सफाई कामगारांपैकी एक महिला दलित आहे. या महिलेचा समावेश त्या पाच सफाई कामगारांमध्ये होता, ज्यांचे पाय मोदींनी धुतले होते. आमचे पाय धुतल्याने आयुष्यात काहीही बदल झाला नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आम्हाला कामाचा खूप थोडा मोबदला मिळतो. यात घर चालविणे कठिण आहे. सर्वांना घरं, गॅस मिळाले, आम्ही काहीही मिळालं नसून अजुनही आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवत असल्याचे महिलेने म्हटले. तर महिलेच्या पतीने पंतप्रधानांकडून सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सफाई कामगारांमध्ये असलेल्या ज्योती नावाच्या महिलेने देखील आपले मत व्यक्त केले. पंतप्रधानांनी आमचे पाय धुतल्याची शरम वाटते. एवढ्या मोठ्या माणसाचे पाय आम्ही धुवायला हवे होते. मोदींनी पाय धुतल्याने केवळ सन्मान मिळाला. आयुष्यात काहीही बदल झाला नाही. असंही ज्योती यांनी म्हटले आहे. केवळ हाताला काम हवं, एवढीच इच्छा ज्योती यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशात सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विविध कामांचं सत्य विरोधकांकडून समोर आणले जात आहे. महाराष्ट्रात देखील राज ठाकरे यांनी पहिले डिजीटल गाव असलेल्या हरिसालमधील सत्य परिस्थिती समोर आणली होती. आता सफाई कामगारांची माहिती समोर आली आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.