नवी दिल्ली - भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला असून मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. काही वेळापूर्वीच वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइटला पाडल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यासाठी मोदीजी टीव्ही, रेडियो आणि समाज माध्यमांवर लाईव्ह आले होते. त्यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत असून मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मोदींनी केलेली घोषणा निव्वळ नाटक असल्याचे म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोदींवर हल्लाबोल करताना ट्विट केले की, भारताचा मिशन शक्ती कार्यक्रम अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आपले शास्त्रज्ञ, डीआरडीओ आणि इस्रोचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्याकडून या संदर्भात करण्यात आलेली घोषणा म्हणजे निव्वळ नाटक आहे. मोदींकडून निवडणुकीच्या काळात राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. आपला कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी या मिशनची घोषणा करण्याची आवश्यकता नव्हती, असंही ममता यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून मिशन शक्तीमधील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. यावेळी राहुल यांनी मोदींना जागतीक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत टोला लगावला आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील मोदींना टोला लगावताना म्हटले की, आज पुन्हा एकदा मोदींनी टीव्हीवर फुकटचा एक तास घेत जनतेचे लक्ष मुख्य समस्यांकडून हटविले. असो. डीआरडीओ आणि इस्रोचे अभिनंदन