नवी दिल्ली - अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुलाखत घेतली. ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. मात्र या मुलाखतीतील मोदींच्या काही मुद्दांवर नेटकरी राज ठाकरे यांचा पॅटर्न राबवताना दिसत आहेत. राज ठाकरे सध्या पुराव्यासह मोदींवर टीका करत आहे. त्याचा कित्ता गिरवत नेटकरी मोदींच्या मुलाखतीतील काही मुद्दांना खोडताना दिसत आहेत. आपण मुख्यमंत्री होईपर्यंत स्वत:चे कपडे धुत होतो, असा दावा मोदींनी केला आहे. यावर नेटकरी आक्षेप घेत असून मोदींच्या धोब्यासंदर्भातील बातमीचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.याचा शोध घेतला असता, यात तथ्य आढळून आले आहे. अक्षय कुमारला दिलेल्या अराजकीय मुलाखतीत मोदींनी आपल्या जीवनाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी मोदींना कपड्याचा पेहराव करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोदी म्हणाले की, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत स्वत:चे कपडे स्वत: धुत होतो. त्यावर आता एक बातमी व्हायरल होत आहे. यानुसार मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी संघाचे प्रचारक होते. त्यावेळी त्यांच्याकडे चांद मोहम्मद नावाचे धोबी कामाला होते. एका इंग्रजी वेबपोर्टलवर २३ ऑक्टोबर २०१७ रोजी चांद मोहम्मद यांच्या निधनाची बातमी छापून आली होती. त्यामध्ये धोबी चांद मोहम्मद यांच्याविषयीची माहिती उपलब्ध आहे. गुगलवर सर्च केल्यास ही बातमी सापडते.दरम्यान मोदी म्हणाले होते की, आपण मुख्यमंत्री होईपर्यंत स्वत:चे कपडे हाताने धुत होतो. परंतु, त्यांच्याकडे १९७० पासून चांद मोहम्मद नावाचे धोबी होते. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर २३ ऑक्टोबर २०१७ रोजी चांद यांचे निधन झाले होते. त्यावेळी मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देऊ केली, असा उल्लेख त्या बातमीत आहे. चांद मोहम्मद यांची गोध्रामधील काजीवाड येथे यादगार नावाची लॉन्ड्री होती. त्यावेळी नरेंद्र मोदी बराच काळ तिथे राहात होते.संघाचे प्रचारक असताना मोदींकडे चांद मोहम्मद कपडे धुण्यासाठी कामाला होते. तर मोदींनी आपण आपले कपडे स्वत: धुत असल्याचे म्हटले आहे. परंतु, मोदींकडे असलेल्या धोब्याच्या बातमीमुळे मोदींचा हा दावा खोटा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वत: चे कपडे धुण्याचा मोदींचा दावा खोटा ? २०१७ मध्ये धोब्याचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:14 AM