नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मागे पडलेला राम मंदिराचा मुद्दा, निवडणूक होताच पुन्हा चर्चेत आला आहे. रामाचं काम करायचं आहे आणि हे काम होणारच. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकमोहन भागवत यांनी म्हंटले आहे. राजस्थानच्या उदयपुर येथील दौऱ्यावर असताना राम मंदिरावर विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.
मागील पाच वर्षात आरएसएसने भाजपवर राम मंदिर बाबतीत दबाव आणला. भाजपच्या काळात राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचे अनेकवेळा मोहन भागवत यांनी बोलवून दाखवले होते. मात्र, राम मंदिराचा विषय न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगत भाजपने लोकसभा निवडणुकीत यापासून दोन हात लांब राहणे पसंद केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला आलेल्या यशानंतर पहिल्यांदाच राम मंदिर विषयी मोहन भागवत यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता प्रभू रामाचं काम करायचं आहे, रामाचं काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल, असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे.
प्रभू रामाचं काम करणं म्हणजे आपलंच काम करण्यासारखं आहे. आपलं काम आपण स्वत: केलं तर ते चांगलं होतं. ते दुसऱ्यांवर सोपवलं तर त्यावर लक्ष ठेवावं लागतं, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत आल्यानंतर राम मंदिराची पुन्हा आठवण करून देण्यासाठीच भागवत असे म्हणाले असल्याची चर्चा आहे. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतरही राम मंदिरा बाबत मोदींनी अपेक्षीत भूमिका घेतली नसल्याने संघाने उघड नाराजी व्यक्त केली होती.