नवी दिल्ली - कर्नाटकातील बंगळुरू मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अभिनेते प्रकाश राज पराभवाच्या छायेत आहेत. त्यांनी आपला पराभव जवळजवळ मान्य केला आहे. तसं ट्विट त्यांनी केले असून धर्मनिरपेक्ष भारतासाठी आपला लढा कायम राहिल, असंही त्यांनी सांगितले. देशात नरेंद्र यांच्या नेतृत्वातील एनडीएने अभूतपूर्व यश मिळवले आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेंव्हा देशात एनडीएने ३४८ च्या जळवपास जागांवर आघाडी घेतली आहे.
प्रकाश राज ट्विटमध्ये म्हटले की, माझ्या गालावर सनसनीत चपराक बसली आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात मला ट्रोल केले जाईल, माझा अपमान करण्यात येईल, मला शिव्या घातल्या जातील, तेवढाच मी धर्मनिरपेक्ष भारतासाठी आणखी ताकतीने लढा सुरू ठेवणार आहे. पुढील कठिण प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्यांचे खूप-खूप आभार.
प्रकाश राज सेंट्रल बंगळुरूमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या ठिकाणी त्यांना मोठा पराभव सहन करावा लागणार आहे. प्रकाश राज हे तिसऱ्या स्थानी असून येथून भाजपचे उमेदवार पी.सी. मोहन आघाडीवर असून दुसऱ्या स्थानी काँग्रेसचे रिझवान अर्शद आहेत. मागील वर्षभरापासून प्रकाश राज यांनी मोदी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. तसेच ते अनेकदा ट्रोलरच्या निशान्यावर देखील होते.