नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रमाणे अनेक प्रदेशिक पक्षांना सोबत घेतले, त्याचप्रमाणे विरोधकांनी देखील युती करून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. आता या युती आणि आघाड्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीला टोला लगावला आहे.
समाजवादी पक्षाने युतीच्या नावाखाली मायावती यांच्या बसपाचा फायदा घेतल्याची गुगली पंतप्रधान मोदींनी टाकली. काँग्रेस आणि सपाने मायावतींचा लाभ घेतला. त्यामुळे मायावती आता जाहीर सभांमधून काँग्रेसवर टीका करताना दिसत असल्याचे मोदींनी सांगितले. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे आयोजित सभेत मोदी बोलत होते. प्रतापगडमधून २०१४ मध्ये अपना दलचे कुंवर हरिवंश सिंह निवडून आले होते. यावेळी मात्र भाजपने हा मतदार संघ अपना दलला न देता स्वत:कडे ठेवला आहे. तसेच संगमलाल गुप्ता यांना तिकीट दिले. संगमलाल हे अपना दल एसचे आमदार आहेत. ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
यावेळी मोदींनी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. काँग्रेसचे नेते काही दिवसांपूर्वी मोदी लाटेला घाबरत होते. आता तेच म्हणतात, मोदींच्या मेहनतीवर आणि देशप्रेमावर डाग लागत नाही, तोपर्यंत मोदींना पराभत करता येणार नाही. परंतु, काँग्रेसने लक्षात ठेवावे की, मोदी पाच दशकांपासून न थांबता देशासाठी कष्ट घेत आहे. भारत मातेची उपासना करत आहे, असंही मोदींनी म्हटले.