पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून पुन्हा विक्रमी बहुमत मिळवून पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला सज्ज झालेल्या नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारचा नवा 'नारा' जाहीर केला. National Ambition, Regional Aspiration - अर्थात राष्ट्रीय आकांक्षा आणि प्रादेशिक अस्मिता यांचा मेळ घालून समृद्ध भारत हे नवं जनआंदोलन उभं करायचं आहे आणि विकसनशील देश हे लेबल हटवायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. पंतप्रधानपदासाठी तब्बल ३५३ खासदारांनी त्यांना एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर केलेल्या विस्तृत भाषणात, मोदींनी ज्येष्ठांबद्दल आदर व्यक्त केला, जनतेचे आभार मानले, नव्या खासदारांना मार्गदर्शन केले, जुन्या खासदारांचे कान टोचले आणि आपल्या सरकारची दिशा काय असेल, हेही सांगितले. २०१४ मध्ये 'स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या मोदींनी यावेळी 'समृद्ध भारता'चा इरादा बोलून दाखवला आहे.
>> देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं अपरिहार्य आहे. एनडीए हे एक विश्वस्त आंदोलन आहे. हा प्रयोग आणखी सशक्त करायचा आहे. एकट्या भाजपाचे ३०३ खासदार निवडून आले असतानाही मी हे बोलतोय, कारण ते आवश्यक आहे.
>> राष्ट्रविकास हे आपलं ध्येय आहेच, पण त्यासोबत प्रादेशिक अस्मिता जपणं, जोपासणं हेही गरजेचं आहे.
>> एनर्जी आणि सिनर्जी या रसायनाच्या जोरावरच एनडीए सामर्थ्यशाली झाली आहे.
>> अल्पसंख्यांकांच्या मनातील काल्पनिक भीती घालवणे हे मुख्य आव्हान आहे.
>> सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, हे ब्रीद घेऊन काम करायचं आहे.
>> घरातील उपासना पद्धती कुठलीही असो, बाहेर पडल्यानंतर भारत देश हीच आपली माता आहे.
>> जीव मे ही शिव है. जनसेवा हीच ईश्वरसेवा, याहून देशहिताचा दुसरा मार्ग असू शकत नाही.
>> सत्ताभाव, सत्तेची हाव जनता स्वीकारत नाही. याउलट, सेवाभावापुढे ती नतमस्तक होते.
>> समृद्ध भारत हे नवे जनआंदोलन असेल. 'विकसनशील देश' हे लेबल हटवायचं आहे.
>> अनेक प्रस्थापितांना पराभूत करून आल्याचा गर्व बाळगू नका. तुम्ही मोदींमुळे निवडून आलेला नाहीत, तर जनतेच्या आदेशामुळे निवडून आला आहे. जनतेच्या मतांचा सन्मान करा.