नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कडाडून टीका करताना दिसत आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. केवळ राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रवादाचा मुद्दा नसून देशातील मुलभूत समस्या सोडविणे देखील राष्ट्रवादच असल्याचं तेजस्वी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मोदीजी सध्या राष्ट्रवादाची भाषा करतात. परंतु, जनतेच्या मुद्दावर ते बोलत नाहीत. विकासाचं राजकारण न करता विनाशाचं राजकारण भाजपने केले आहे. मात्र देशातील युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवादच असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. महायुतीतून नितीश कुमार गेले ते बरचं झालं. ते जिथे जातील त्यांना बुडवतील अशी त्यांची प्रतिमा असल्याची घाणाघाती टीका तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली.
यावेळी तेजस्वी यादव यांनी लोकांना उद्देशून नितीश कुमार यांच्याविरुद्ध नारा दिला. 'ऐसा कोई सगा नाही, जिसे पलटू चाचाने ठगा नही'. याचा अर्थ असा होतो की, नितीश कुमार यांच्या जवळचा एकही व्यक्ती असा नाही, ज्याचा त्यांनी विश्वासघात केला नाही. लालू प्रसाद यादव यांनी कायम भाजपविरुद्ध लढा दिला आहे. कधीही मागे हटले नाही. परंतु, नितीश कुमार हे पलटू चाचा असल्याचे तेजस्वी म्हणाले.
पंतप्रधापदासाठी नितीश कुमार यांचे प्रयत्न
स्वत:ला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षीत यश मिळणार नाही. निकालानंतर भाजपला स्थिती बिघडणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे.