नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील उरलेल्या दोन टप्प्यातील मतदान १२ आणि १९ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दीक चकमक वाढली आहे. काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी केले आहे. इंदुर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे ज्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला चौकीदार म्हणतात. मात्र, चौकीदार गरिबांचे दार सोडून अंबानींच्या दारासमोर उभा राहतो. काँग्रेसने आतापर्यंत देशाला ५ गांधी दिले. भाजपने मात्र, नीरव मोदी, ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी असे भगोडे लोक दिले असल्याचे सिद्धू म्हणाले.
इंदुर लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी मतदान होणारा आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना २०१४ मध्ये भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, यावेळी त्यांच्या जागी शंकर लालवाणी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.