नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरुद्ध आजमगड मतदार संघात भाजपने भोजपुरी चित्रपटातील सुपस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांना तिकीट दिले आहे. मात्र निरहुआ यांनाच अखिलेश यादव किंवा त्यांचे वडील मुलायमसिंह यादव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत हवे होते. अखिलेश यादव पंतप्रधानपदासाठी शर्यतीत असते तर आपण त्यांना पाठिंबा दिला असता असंही भाजप उमेदवार निरहुआ यांनी सांगितले.
अखिलेश स्वत:ला यादवांचे नेते समजतात. यादव म्हटले की, सपाचा माणून असा समज झाला आहे. परंतु, यादवांची ओळख अखिलेश सध्या धुळीस मिळवत असल्याची टीका निरहुआ यांनी केली. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या इमानदार व्यक्तीला पाडण्यासाठी युती का, करत आहात असा सवाल निरहुआ यांनी उपस्थित केला. तसेच मुलामसिंह यादव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असते तर आपण त्यांना पाठिंबा दिला असता, असंही निरहुआ यांनी नमूद केले.
दरम्यान तुम्हाला पंतप्रधान व्हायचे नाही, मग मोदींना मागे खेचून यादवांचा सन्मान धुळीस का मिळवत आहात. यादवांना देशाच्या विरोधात का घेऊन जात आहात, असा सवालही निरहुआ यांनी अखिलेश यांना केला.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा असायलाच हवा, असं सांगताना सपा राष्ट्रवादाच्या विरोधात असल्याचे निरहुआ म्हणाले. अखिलेश मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर देत आहे. मात्र आजमगडमधील समिकरणे अखिलेश यांच्याविरुद्ध गेल्याचा दावा निरहुआ यांनी केला आहे. तसेच आपण राजकारणात कायम सक्रिय राहणार असून आजमगडमधील प्रत्येक व्यक्तीला आपण भाजपशी जोडणार असल्याचे निरहुआ यांनी सांगितले.