नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये 674 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी याबाबतचा एक व्हिडीओही ट्वीट केला आहे. काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असल्याचा आरोप एका महिलेने या व्हिडीओमध्ये केला आहे.
महिलेने 'माझा हात पकडून जबरदस्तीने काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले बटण दाबायला लावले. मला भाजपाला मतदान करायचे होते' असे व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या घटनेनंतर स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सर्तक करण्यासाठी मी हा व्हिडिओ ट्वीट केला. ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींना अशा प्रकारच्या राजकारणासाठी शासन करायचे की नाही ते या देशातील जनतेला ठरवायचे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
अमेठीत मतदान केंद्र बळकावण्याचा प्रकार, स्मृती ईराणींचा राहुल गांधींवर आरोपकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. या फेरीमध्ये महिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यामध्ये संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा, स्मृती इराणी, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी हे प्रमुख मैदानामध्ये आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14 जागांवर लढाई होत असून, त्यातील 12 जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. सपा-बसप-आरएलडीच्या आघाडीनंतर बदललेल्या स्थितीत या जागा राखणे हे भाजपासमोर आव्हान असेल.